चिपळूण : पैशांच्या वादातून वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न, चिपळूण तालुक्यातील धक्कादायक घटना

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पैशांच्या वादातून ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निवळी लाखणवाडी येथे घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमी महिलेच्या फिर्यादीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री पांडुरंग गायकवाड (वय ७२, रा. निवळी लाखणवाडी, ता. चिपळूण) या २० जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी होत्या. त्यावेळी ओंकार राजेंद्र लाखण उर्फ मन्ना (रा. निवळी लाखणवाडी) हा हातात दोरी घेऊन त्यांच्या घरात अनधिकृतपणे शिरला.

घरात प्रवेश करताच आरोपीने जयश्री गायकवाड यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने सोबत आणलेली दोरी त्यांच्या गळ्यात मागून टाकून गळा आवळण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात त्यांचा श्वास गुदमरू लागला. मात्र, आरडाओरड आणि झटापटीमुळे त्यांचा जीव वाचला असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

घटनेनंतर जखमी झालेल्या जयश्री गायकवाड यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपी ओंकार राजेंद्र लाखण (मन्ना) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९ आणि ३३३ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २१ जुलै २०२६ रोजी पहाटे १२.१० वाजता दाखल करण्यात आला.

या घटनेमुळे निवळी लाखणवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वृद्ध महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *