कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत करण्यासाठी रिसॉर्टमध्ये गेलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यात घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे साखरी-नाटे परिसरात शोककळा पसरली असून कोतवडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हसन सलमान कोतवडेकर (वय ६, रा. साखरी-नाटे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. खेळण्याच्या, बागडण्याच्या आणि आयुष्याचा निरागस आनंद लुटण्याच्या वयात असलेल्या हसनचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हसन हा आपल्या कुटुंबीयांसोबत कोतापूर फाटा परिसरातील एका रिसॉर्टमध्ये फिरण्यासाठी गेला होता. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि कुटुंबीयांसमवेत वेळ घालवण्यासाठी सर्वजण तेथे गेले होते. परिसरातील विविध मनोरंजन सुविधांचा आनंद घेत असताना सायंकाळी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास हसन स्विमिंग पूल परिसरात गेला.
यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. काही काळ ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही. मात्र काही वेळानंतर हसन दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी तो स्विमिंग पूलमध्ये बुडाल्याचे लक्षात आले. उपस्थितांनी तातडीने धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासणीअंती हसनचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही क्षणांपूर्वी आनंदाने बागडणारा हसन कायमचा दूर गेल्याची जाणीव होताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले.
प्राथमिक माहितीनुसार, पाण्यात बुडून गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजापूर येथे पाठविण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













