संगमेश्वर : APK फाईल ठरली घातक, तरुणाच्या खात्यातून 55 हजार 599 रुपये लंपास, APK फाईल डाऊनलोड करण्यापूर्वी सावधान

banner 468x60

देवरूख : सोशल मीडियावरून आलेली अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल डाऊनलोड करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय देवरूख परिसरात आला आहे. इन्स्टाग्रामवरून आलेली संशयास्पद APK फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमध्ये संशयास्पद हालचाली सुरू झाल्या आणि त्यानंतर एका २१ वर्षीय तरुणाच्या बँक खात्यातून ५५ हजार ५९९ रुपये परस्पर वळते करण्यात आले. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साडवली साईनगर, ता. संगमेश्वर येथील कौस्तुभ संतोष सोमण (वय २१) हा ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात लिंक्डइनचे सत्र सुरू असताना उपस्थित होता. त्यावेळी सकाळी सुमारे ११ वाजता त्याच्या इन्स्टाग्राम ॲपवर एका अनोळखी व्यक्तीकडून APK फाईल प्राप्त झाली.

कौस्तुभने ही फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा मोबाईल त्याच दिवशी चार ते पाच वेळा अचानक बंद पडला. दुसऱ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता त्याचा मोबाईल पुन्हा बंद पडला. मोबाईल सुरू केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या गुगल पे खात्यातून ५५ हजार ५९९ रुपये अज्ञात व्यक्तीच्या kumarrakesh2997@bpunity या UPI आयडीवर वळते करण्यात आले.

९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कौस्तुभने आपल्या बँक खात्यावरील शिल्लक तपासली. त्यावेळी खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी कौस्तुभ सोमण याने दिलेल्या फिर्यादीवरून १ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५५/२०२६ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, देवरूख पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सायबर भामटे सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्स किंवा इतर माध्यमांतून APK फाईल पाठवून नागरिकांना ती इन्स्टॉल करण्यास प्रवृत्त करू शकतात. अशा फाईलच्या माध्यमातून मोबाईलमधील संवेदनशील माहिती धोक्यात येण्याची शक्यता असते.

त्यामुळे अनोळखी व्यक्तीकडून आलेली APK फाईल, लिंक किंवा ॲप डाऊनलोड करू नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अनोळखी ॲपला परवानग्या देणे तसेच बँकिंग किंवा OTPशी संबंधित माहिती शेअर करणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *