चिपळूणमध्ये ‘मुस्लिम गौरक्षा दल’ स्थापन; गोसंरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची नगरसेवक साजिद सरगुरोह यांची घोषणा

banner 468x60

चिपळूण शहरात गोसंरक्षण, पशुकल्याण आणि जनजागृतीसाठी एक नवा उपक्रम हाती घेत असल्याची घोषणा चिपळूणचे काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरोह यांनी केली आहे. “आजपासून चिपळूण मुस्लिम गौरक्षा दल स्थापन करण्यात येत असून गाईंचे संरक्षण, पशुकल्याण आणि कायदेशीर मार्गाने जनजागृती करण्यासाठी हे दल कार्यरत राहील,” असे त्यांनी जाहीर केले.

banner 728x90

सरगुरोह यांनी सांगितले की, गोसंरक्षण हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि मानवतावादी विषय असून जनावरांच्या संरक्षणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. या उद्देशाने मुस्लिम समाजातील युवकांना एकत्र करून गौरक्षा दलाची स्थापना करण्यात येत आहे. हे दल कोणत्याही प्रकारे कायदा हातात न घेता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाअंतर्गत चिपळूण आणि परिसरातील स्थानिक पशुकल्याण संस्था, पशु कल्याण मंडळे, गोशाळा आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांच्या देखभालीसाठी मदत, जखमी जनावरांच्या उपचारासाठी सहकार्य तसेच गोशाळांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच गाईंची अवैध वाहतूक अथवा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास संबंधित शासकीय यंत्रणा आणि पोलिसांकडे कायदेशीर तक्रार करण्यात येईल. कोणत्याही संशयास्पद प्रकाराची माहिती प्रशासनाला देऊन कायद्याच्या चौकटीत राहून कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सरगुरोह यांनी सांगितले.

“गोसंरक्षणाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. समाजात सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवत पशुकल्याणासाठी सकारात्मक काम करण्यावर आमचा भर राहील,” असे त्यांनी नमूद केले.

या घोषणेनंतर शहरात या उपक्रमाची चर्चा सुरू झाली असून विविध सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पशुकल्याण आणि गोसंरक्षणासाठी समाजातील विविध घटकांचा सहभाग वाढल्यास जनावरांच्या संरक्षणाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *