मंडणगड तालुक्यातील कळकवणे गावातील एका ८७ वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणकोट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावजी अर्जुन पवार (वय ८७, रा. कळकवणे, ता. मंडणगड) हे ३ जून २०२६ रोजी दुपारच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात काम करण्यासाठी गेले होते. बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नसल्याने त्यांचे पुत्र संजय रावजी पवार यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
संजय पवार यांनी प्रथम गोठ्यात जाऊन पाहणी केली. मात्र तेथे रावजी पवार आढळून न आल्याने नातेवाईक, गावकरी आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. शोधमोहीमेदरम्यान सोनू टेंबीचा टेप परिसरातील भोंडग्याच्या झाडाला काळ्या रंगाच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत रावजी पवार आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने गळफासाची दोरी कोयत्याने कापून त्यांना खाली उतरविण्यात आले. तातडीने खाजगी वाहनातून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत बाणकोट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूमागील कारणांचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
या घटनेमुळे कळकवणे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













