खेड : मेटे मोहल्ल्यातील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपी जेरबंद; खेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

banner 468x60

खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला परिसरात जुन्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी खेड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत फरार असलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

banner 728x90

६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेटे मोहल्ल्यातील कब्रस्तानजवळील रस्त्यावर ही गंभीर घटना घडली होती. फिर्यादी यांचे सख्खे चुलत भाऊ शफी अब्दुल्ला वरवटकर (वय ५५) हे त्या ठिकाणी असताना, जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी अशरफ महमूद बोट, गणी इस्माईल बोट आणि कादिर शमशुद्दीन घारे यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

आरोपींनी शिवीगाळ करत शफी वरवटकर यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, शफी वरवटकर यांची यापूर्वी हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आरोपींना होती. तरीदेखील त्यांनी त्यांच्या छातीवर वारंवार प्रहार करत अमानुष मारहाण केली. या गंभीर मारहाणीत शफी वरवटकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३५१(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी तपास मोहीम राबवली.

दरम्यान, २३ एप्रिल २०२६ रोजी आरोपी खेड शहरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे खेड एस.टी. स्टँड परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी दक्षतेने पाहणी करत रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी कादिर शमशुद्दीन घारे (वय ४८), गणी इस्माईल बोट (वय ५४) आणि अशरफ महमूद बोट (वय ५५) या तिघांना ताब्यात घेत अटक केली.

ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि खेड उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार आणि सुरज मोरे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, आरोपींना अटक झाल्याने स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून खेड पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *