रत्नागिरी जिल्ह्यात उद्या मंगळवारी सर्व शाळा- महाविद्यालयांना सुट्टी

banner 468x60

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाने मंगळवार, ७ जुलैसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना मंगळवारी (दि. ७) सुट्टी जाहीर केली आहे.

banner 728x90

हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


या आदेशानुसार सर्व अंगणवाड्या, सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, तसेच सर्व महाविद्यालये, व्यावसायिक व प्रशिक्षण संस्थांमधील शैक्षणिक कामकाज मंगळवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे, नदी-नाले, पूरग्रस्त भाग व दरडप्रवण ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *