लांजा येथे घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत भरवस्तीत असलेल्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना ग्रामस्थांनी तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करून पकडले. लांजा तालुक्यातील रिंगणे-गांगोवाडी येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी संजय ऊर्फ मोहन निकाजा भोसले (२१) आणि नितेश ऊर्फ संतोष मरदान भोसले (२५), दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड यांना ताब्यात घेतले आहे.
रिंगणे-गांगोवाडी येथील संतोष श्रीधर आयरे हे कामानिमित्त मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे रस्त्यालगत भरवस्तीत बंद घर आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघे संशयित त्यांच्या घराच्या अंगणात शिरले. त्यांनी दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा पाना व अन्य साहित्याच्या सहाय्याने तोडण्यास सुरुवात केली.
दरम्यान, हा प्रकार शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थ जमा होत असल्याचे लक्षात येताच दोन्ही संशयितांनी नंबरप्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या होंडा शाईन दुचाकीवरून राजापूर तालुक्यातील कारवलीच्या दिशेने पलायन केले.
मात्र, ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. रिंगणेचे सरपंच संजय आयरे, कोंडगे येथील सामाजिक कार्यकर्ते महेश विश्वासराव आणि कुरंग येथील गणेश सुर्वे यांनी वाहनाने संशयितांचा पाठलाग केला. तब्बल १५ किलोमीटर पाठलाग केल्यानंतर कारवली येथे दोन्ही संशयितांना पकडण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीची नंबरप्लेट नसलेली होंडा शाईन दुचाकी, मोठा पोपट पाना, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी सुरा, कटर, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क आणि ओळखपत्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात नितेश भोसले याच्यावर सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार अधिक तपास करत आहेत.
ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उधळून लावला गेल्याने परिसरात ग्रामस्थांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













