खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील अतिक्रमणावर कारवाई, 7 दिवसांत बांधकाम हटवण्याचे आदेश

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील एक्सेल फाटा (तलारी फाटा) येथे महामार्गाच्या संपादित जागेवर करण्यात आलेल्या बेकायदेशीर पक्क्या बांधकामाविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित बांधकाम हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत देत अधिकृत नोटीस बजावण्यात आली आहे.

banner 728x90

प्रथम वर्ग सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रोहा-रायगड यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस संबंधित बांधकामधारकास देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन व रहदारी) अधिनियम २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असून, “सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून हटवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करून बांधकाम निष्कासित करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.


या नोटीशीच्या प्रती कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण, तसेच उपविभागीय अधिकारी खेड व चिपळूण, तहसीलदार खेड व चिपळूण आणि खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.


महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, संबंधित व्यक्ती स्वतःहून हे बांधकाम काढून टाकणार की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण थेट कारवाई करून ते हटवणार, याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे भविष्यात महामार्गालगत होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *