मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाकानजीक आज शुक्रवारी (९ मे) सकाळी भीषण अपघात घडला. प्रवासी उतरविण्यासाठी रस्त्याकडेला थांबलेल्या आराम बसला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणारी आराम बस सकाळी साडेसातच्या सुमारास भरणे नाका येथे काही प्रवासी उतरविण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेने वेगाने येणाऱ्या कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने बसच्या पाठीमागील भागाला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (वय ४८), शिल्पा परशुराम खेराडे (५०), जनार्दन खेराडे (४०), परशुराम गुणाजी खेराडे (६०, सर्व रा. संगमेश्वर) तसेच अर्जुन धोंडीबा चाळके (३०, रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विनय तोडणकर, संतोष नलावडे, विवेक गांधी, परवेज मणियार यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. खेड पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी परशुराम खेराडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
विशेष म्हणजे, अपघातग्रस्त कारमध्ये बसविण्यात आलेला सिलेंडरचा टँक धडकेनंतर पुढील सीटपर्यंत सरकला होता. सुदैवाने तो फुटला नाही. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे महामार्गावरील बेदरकार वाहनचालना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













