दापोली तालुक्यातील आपताडी गावातील जमिनी खरेदी करून या ठिकाणी लोढा यांचा गृह प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प होत असताना प्रकल्प अधिकारी हे येथील ग्रामस्थांना दमदाटी करतात, असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.

यामुळे आपताडी गावातील ग्रामस्थ येथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आक्रमक झाले. दि. १९ रोजी सायंकाळी माजी आमदार संजय कदम, शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी आपताडी गावात जाऊन येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ग्रामस्थांना त्रास दिलात, तर याद राखा असा इशारा यावेळी माजी आमदार संजय कदम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिला.
आपताडी गावातील शेकडो एकर जागा ही लोढा यांनी गृह प्रकल्पासाठी खरेदी केली आहे.
यामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक देखील झाली आहे, असे ग्रामस्थ सांगतात. प्रकल्प अंतर्गत असणारे रस्ते, वाटा ग्रामस्थांसाठी बंद करण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या असणाऱ्या जागा विकण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी केला.
प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे शेतीची नासाडी होत आहे. जिल्हा परिषदेचा रस्ता नष्ट करण्याचा घाट कंपनीने घातला असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी नरेंद्र करमरकर, खेड शहर प्रमुख दर्शन महाजन, मंदार शिर्के, विश्वास कदम, चंद्रकांत राणे यांनी ग्रामस्थांची बाजू मांडली.
जिल्हा परिषदेचा रस्ता तोडण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली कुणी? असा सवाल तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केला. ग्रामस्थांची होणारी गैरसोय यापुढे होणार नाही.
त्यांची नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन कंपनीतील अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर तूर्तास या वादावर पडदा पडला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















