केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे.
राणे यांच्या राज्यसभा खासदारकीची मुदत आता संपत असून त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करण्याची सूचना भाजप नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेची असल्याने ती शिंदे गटाला हवी आहे. सामंत लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर्सही मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
कोकणातील लोकसभा आणि विधानसभेचे अनेक मतदारसंघ अनेक वर्षे शिवसेनेकडे असल्याने तेथे भाजपची ताकद तुलनेने कमी आहे. मात्र कोकणात ताकद वाढवून भक्कमपणे पाय रोवण्याचे भाजपने ठरवले आहे. त्या दृष्टीने राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी दिली जाणार आहे.
राज्यामध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी महायुती असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार देण्यात यावा, अशी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे.
याचा निर्णय दिल्लीतील पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. महायुतीचा उमेदवार म्हणून ज्याला उमेदवारी संधी दिली जाईल त्याला निवडून आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मततदार संघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये सध्या विचारविनिमय सुरू आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्याकडून उमेदवारीवर दावेदारी केली जात आहे. महायुतीच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था असताना बांधकाममंत्री चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोंड्ये-मधलीवाडी प्रवेशद्वार ते सतीचा माळ रस्त्याचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली कामे व राज्यातील महायुतीच्या सरकारने केलेली कामे लोकांसमोर घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत. सर्वसामान्यांसाठी काम करणारे हे सरकार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे.
राज्यातही महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेसाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातही आम्ही ४५ पार जाणार आहोत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















