ग्राहकांना देण्यात येणाऱ्या पावत्यांवर फ्री पॅलेस्टाईन असा उल्लेख करुन समाजात तेढ माजवू पहाणाऱ्या तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील एका व्यावसायिकाला स्थानिक ग्रामस्थानी चांगलाच इंगा दाखवित पोलीस ठाण्यात आणले.
मात्र चुक मान्य करीत ते पावती पुस्तकच बदलुन टाकतो आणि यापुढे ग्राहकाना त्यामधील पावती देणार नसल्याची ग्वाही दिल्यानंतर प्रकरण मिटले असून झाल्या प्रकाराबद्दल संपूर्ण परीसरातुन संताप व्यक्त होत होता.
जागतिक पातळीवर गेले दोन महिन्यान्हुन अधिक काळ इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांचे घनघोर युध्द सुरु असुन ते तात्काळ मिटावे म्हणुन जागतिक पातळीवरुन शिष्टाई सुरु आहे. या युध्दाचे कमालीचे परीणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक क्षेत्रात झाले आहेत.
त्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील एका व्यावसायिकाने ग्राहकाना देण्यात येणाऱ्या मालाच्या पावत्यांवर तळाशी फ्री पॅलेस्टाईन असा उल्लेख केला असल्याची बाब अनेक खरेदीदारांच्या लक्षात आली आणि ती खटकली त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.
दुसऱ्या देशात सुरु असलेल्या युध्दावरुन आपल्या परीसरात समाजात तेढ निर्माण करु पहाणाऱ्या त्या व्यावसायिकाविरुध्द प्रचंड चीड निर्माण झाल्यानंतर अनेक ग्रामस्थ जमा झाले आणि त्यानी त्या व्यावसायिकाला चांगलेच फैलावर घेतले. प्रकरण रायपाटण पोलीस दुरक्षेत्रापर्यन जावुन पोचले.
दरम्यान तेथे राजापूर पोलिस निरिक्षक भरत धुमाळ यानी रायपाटण पोलीस दुरक्षेकत्राला भेट देत सामंजस्याने हे प्रकरण हाताळले. युध्द परदेशात सुरु असताना त्याचे समर्थन आपल्या इथे कशासाठी त्यातुन काय साध्य करायचे आहे असे संतप्त सवाल उपस्थीतामधुन होत होते. त्या व्यावसायिकाच्या कुटुंबातील जेष्ठ मंडळी देखील पोलीस ठाण्यात आली होती.
त्यानीही त्या प्रकाराबद्दल माहित नसल्याचे सांगितले मात्र एकुणच प्रकरणाची तिव्रता लक्षात घेता प्रकरण वाढणे परवडणारे नाही याची वेळीच जाणीव झाली आणि आपण वाईट हेतुने तसे केले नसल्याचे सांगत तो उल्लेख असलेली पावत्या यापुढे ग्राहकाना देणार नसल्याचे त्या व्यावसायिकाने मान्य केले आणि सामंजस्याने प्रकरण मिटले मात्र त्याची चर्चा सुरु होती.
दरम्यान समाजात चुकीच्या कृत्याने तेढ माजविणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















