चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरातील शिवाजीनगर बसस्थानकासमोर रविवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार शरद तुकाराम गमरे (वय ५८, रा. खांदाटपाली, चिपळूण) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शरद गमरे हे आपल्या दुचाकीने शिवाजीनगर बसस्थानक परिसरातून जात होते. याचवेळी गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर चालक शिवप्रकाश दुबे हा बसस्थानकासमोर प्रवासी उतरविण्यासाठी थांबलेल्या कोल्हापूर-चिपळूण एसटी बसला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. हॉटेल लगूनसमोरील सर्व्हिस रोडवर हा प्रकार घडला. एसटी बसच्या शेजारून जाणाऱ्या गमरे यांच्या दुचाकीला या कंटेनरची जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की शरद गमरे हे कंटेनरच्या चाकाखाली सापडले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही क्षणांतच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली.
दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून निघून जाण्याच्या तयारीत असल्याचे पाहून संतप्त नागरिक आणि महिलांनी त्याला पकडले. यावेळी संतप्त जमावाने चालकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून संबंधित कंटेनरही ताब्यात घेण्यात आला आहे. मृत शरद गमरे यांचा मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाही आणि शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
या घटनेची माहिती समजताच चिपळूण पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ते सचिन गमरे तसेच बौद्ध समाजातील बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली. गमरे यांच्या अपघाती निधनाने खांदाटपाली परिसरासह चिपळूणमध्ये शोककळा पसरली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वर्दळीच्या भागात अवजड वाहनांकडून होणाऱ्या ओव्हरटेकिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एसटी बससारखे प्रवासी वाहन थांबलेले असताना अवजड वाहनांनी घेतलेल्या चुकीच्या ओव्हरटेकिंगमुळे अशा प्रकारचे अपघात किती गंभीर ठरू शकतात, हे या घटनेतून समोर आले आहे. या अपघाताचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













