दापोली तालुक्यातील दाभोळ गावची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. दाभोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच राखी योगेश तोडणकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणून राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासह ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे दाभोळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून दापोली तालुक्याच्या दृष्टीनेही ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

पुण्यातील सन्मान मंच आयोजित आणि नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने ‘ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६’ तसेच ‘महाराष्ट्ररत्न गुणगौरव सन्मान २०२६’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय काम करणाऱ्या सरपंच आणि लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील विविध ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

या सर्वेक्षण प्रक्रियेदरम्यान दाभोळ ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचा आणि सरपंच राखी योगेश तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य देणारे लोकाभिमुख उपक्रम, तसेच ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता राखण्याच्या भूमिकेची निवड समितीने विशेष दखल घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी केलेल्या या कामगिरीची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या निवडीबाबतचे अधिकृत पत्र निवड समितीच्या अध्यक्षांमार्फत राखी तोडणकर यांना प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे येथील नवी पेठमधील पत्रकार भवन येथे आयोजित भव्य ‘ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६’ मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामपंचायत ही ग्रामीण विकासाची महत्त्वाची पायाभूत संस्था असून गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे, प्रशासकीय नियोजन आणि ग्रामस्थांचा सहभाग या माध्यमातून गावाच्या प्रगतीला दिशा मिळत असते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या कामकाजाची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. राखी तोडणकर यांच्या कार्याचा झालेला हा गौरव दाभोळ ग्रामपंचायतीसाठी प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.

या पुरस्कारामुळे दाभोळ गावाच्या विकासकामांना राज्यस्तरावर ओळख मिळाली असून सरपंच राखी योगेश तोडणकर यांच्या यशाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल दाभोळ ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ, हितचिंतक आणि दापोली तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सरपंच राखी तोडणकर यांच्यासह दाभोळ ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, गावाच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या राज्यस्तरीय सन्मानामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











