कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात मेहुण्यावर लोखंडी फुकणीने सात ते आठ वेळा वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील दाभिळवाडी-गोळप येथे घडली आहे. रविवारी (ता. २२ नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गौरव गिरीश पावसकर (वय ४५) आणि गिरीश शशिकांत पावसकर (वय ४८, दोघेही रा. दाभिळवाडी, पावस, ता. रत्नागिरी) यांच्याविरोधात पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विराज विश्वनाथ पावसकर (वय ३६, व्यवसाय खासगी चालक, रा. दाभिळवाडी, गोळप) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विराज यांचा भाऊ सुयोग विश्वनाथ पावसकर याच्यासोबत संशयितांच्या मुलगा अनुश हा गोळप-सुतारवाडी येथे गेला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित गिरीश पावसकर याने फिर्यादी यांच्या भावाच्या सासरी जाऊन वाद घातला.
यावेळी संशयिताने फिर्यादी विराज, त्यांचा भाऊ सुयोग, त्यांचे सासरे संजय वैद्य, सासू शुभदा वैद्य आणि पत्नी भावना यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संशयित घरी परतल्यानंतरही वाद थांबला नाही. संशयितांनी पुन्हा विराज आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद होऊन त्याचे रूपांतर झटापटीत झाले.
या झटापटीदरम्यान संशयित गौरव पावसकर याने स्वयंपाकघरातून लोखंडी फुकणी आणली. त्यानंतर विराज पावसकर यांच्या डोक्यावर सात ते आठ वेळा वार केले. या हल्ल्यात विराज जखमी झाले. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी विराज पावसकर यांनी मंगळवारी (ता. २४ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास पूर्णगड सागरी सुरक्षा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गौरव गिरीश पावसकर आणि गिरीश शशिकांत पावसकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













