गुहागर : इन्स्टाग्रामवर ओळख, मैत्रीचे संबंध आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी, गुहागरच्या 29 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्याचे आणि ८ नोव्हेंबर २०२६ रोजी तिने मुलाला जन्म दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुहागर तालुक्यातील रानवी येथील २९ वर्षीय तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शशिकांत कांबळे (वय २९, रा. रानवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादी जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये तिची समीर कांबळे याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीचे पुढे मैत्रीच्या संबंधात रूपांतर झाले. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये समीर कांबळे याने पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिला गुहागर बाग समुद्रकिनारी फिरण्यासाठी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीतील माहितीनुसार, पहिल्या घटनेनंतर काही दिवसांनी संशयिताने पीडितेला रानवी येथील जंगलमय भागात नेले. तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने आपल्या जबाबात म्हटले आहे. त्यानंतर २ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा गुहागर बाग समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


अत्याचारातून गर्भधारणा; उल्हासनगरमध्ये मुलाला जन्म
पीडितेच्या तक्रारीनुसार, या घटनांनंतर ती गर्भवती राहिली. गर्भधारणेनंतर ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती झाली. यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर पीडितेने समीर कांबळे याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


पोक्सोसह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा
पीडितेच्या फिर्यादी जबाबावरून पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(१), ६४(२), ६५(१), ३५१(२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) मधील कलम ४, ६, ८ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ मधील कलम ३(२)(v), ३(१)(w)(i)(ii) आणि ३(२)(च) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या प्रकरणात पीडितेने केलेल्या आरोपांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपासात घटनाक्रम, पीडितेचा जबाब, वैद्यकीय कागदपत्रे आणि इतर संबंधित पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. या प्रकरणाचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.