रत्नागिरी : खाडीत उडी मारल्याने 39 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, दगडांना धडक लागून तोंडाला गंभीर दुखापत

banner 468x60

रत्नागिरी शहरातील खाडीत उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली. साकीब मेहबुब काझी असे मृत व्यक्तीचे नाव असून, खाडीत उडी घेतल्यानंतर पाण्याखालील दगडांना धडक लागल्याने त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीब मेहबुब काझी (वय ३९, रा. उद्यमनगर, राजापुरकर कॉलनी, रत्नागिरी) यांनी बुधवारी दुपारी सुमारे २ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास रत्नागिरी शहरातील खाडीत उडी मारली. यावेळी त्यांनी पायाला चप्पल बांधल्याची नोंद करण्यात आली आहे. पाण्यात उडी घेतल्यानंतर खाडीतील दगडांना धडक लागल्याने त्यांच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली.

ही घटना लक्षात आल्यानंतर बोट मालक प्रल्हाद शिरगावकर यांनी जखमी साकीब काझी यांना रुग्णवाहिकेतून तातडीने रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, या घटनेची रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १५१/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. साकीब काझी यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरीतील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.