Breaking News
चिपळूण : मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला, शिंगावर उचलून रस्त्यावर आपटल्याने, गंभीर जखमी, मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी रिक्षा संघटना आक्रमक दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत

चिपळूण : मोकाट बैलाचा रिक्षाचालकावर हल्ला, शिंगावर उचलून रस्त्यावर आपटल्याने, गंभीर जखमी, मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी रिक्षा संघटना आक्रमक

banner 468x60

चिपळूण शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच आता मोकाट गुरांचाही उपद्रव नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील स्वागत रिक्षा स्टॉप येथे गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी एका मोकाट बैलाने रिक्षाचालकावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात बैलाने रिक्षाचालकाला थेट शिंगावर उचलून रस्त्यावर जोरात आपटले. या घटनेत कापसाळ येथील रिक्षाचालक बंड्या झगडे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर सध्या कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे चिपळूण शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बंड्या झगडे हे नेहमीप्रमाणे स्वागत रिक्षा स्टॉप येथे आपली रिक्षा उभी करून प्रवाशांची प्रतीक्षा करत होते. यावेळी परिसरात काही मोकाट गुरांचा वावर होता. यातील एका रागीट बैलामुळे परिसरातील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन झगडे यांनी त्या बैलाला तेथून बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बैल पुढे सरकल्याने धोका टळल्याचे वाटत होते. मात्र, अचानक मागे वळलेल्या बैलाने झगडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.


अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र, परिसरातील अन्य रिक्षाचालक आणि नागरिकांनी तत्काळ धाव घेत बैलाला बाजूला हटवले. त्यामुळे झगडे यांची बैलाच्या तावडीतून सुटका झाली. या हल्ल्यात त्यांच्या छातीला, बरगड्यांना आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर त्यांना तातडीने चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना कराड येथे हलवण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दीर्घकाळ विश्रांती घ्यावी लागण्याची शक्यता आहे. रिक्षा व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने या अपघातामुळे झगडे कुटुंबासमोर आर्थिक संकटही उभे राहिले आहे. एका बाजूला उपचारांचा खर्च आणि दुसऱ्या बाजूला उत्पन्नाचे साधन बंद होण्याची वेळ आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, चिपळूण तालुका रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले, संजय जोशी, प्रशांत गोरिवले आणि राजेंद्र गुढेकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कराड येथील रुग्णालयात जाऊन बंड्या झगडे यांची भेट घेतली.

तसेच त्यांच्या कुटुंबीयांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले.
नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
चिपळूण शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट गुरे, गाढवे तसेच भटक्या श्वानांचा वावर वाढत आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचारी, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोकाट जनावरांमुळे यापूर्वीही नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून, आता थेट एका रिक्षाचालकाच्या जीवावर बेतणारी घटना घडल्याने नगरपालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.


नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळेच कष्टकरी रिक्षाचालकावर ही वेळ ओढवली असल्याचा आरोप रिक्षा संघटनेने केला आहे. प्रशासनाने या घटनेची जबाबदारी स्वीकारून बंड्या झगडे यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, तसेच त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले यांनी केली आहे.


आंदोलनाचा इशारा
शहरातील मोकाट जनावरांचा तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा नगरपालिकेविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिक्षाचालक-मालक संघटनेने दिला आहे. त्यामुळे आता या गंभीर घटनेनंतर तरी नगरपालिका प्रशासन जागे होणार का आणि शहरातील मोकाट जनावरांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.