दापोली तालुक्याच्या पर्यटनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तालुक्यातील प्रसिद्ध लाडघर समुद्रकिनाऱ्याला २०२६-२७ या हंगामासाठी प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला असून, यामुळे महाराष्ट्राने जागतिक ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. लाडघरसह रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ च्या हंगामासाठी या समुद्रकिनाऱ्यांना मान्यता दिली आहे.
समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, आवश्यक पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन अशा विविध आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता केल्यामुळे या समुद्रकिनाऱ्यांना हा बहुमान मिळाला आहे.
या यशामागे राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, बीच मॅनेजमेंट कमिटी तसेच स्थानिक नागरिक आणि विविध यंत्रणांचे समन्वित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
नव्याने पुरस्कारप्राप्त झालेल्या या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांचा ब्ल्यू फ्लॅग हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या पुरस्काराचे प्रतीक असलेला प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग नेदरलँड्स येथून प्राप्त होत असून, तो राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
देशभरात २०२६-२७ हंगामासाठी एकूण २२ समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मान्यता मिळाली आहे. यामध्ये १३ समुद्रकिनाऱ्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, ९ नवीन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश झाला आहे.
स्थानिक रोजगार आणि पर्यटन व्यवसायाला मिळणार चालना
या पुरस्कारामुळे लाडघर समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे. देश-विदेशातील पर्यटकांचा ओढा वाढण्यासोबतच हॉटेल व्यवसाय, स्थानिक पर्यटन व्यावसायिक, होमस्टे, जलक्रीडा आणि इतर पूरक व्यवसायांना चालना मिळू शकते. यामुळे स्थानिक रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होण्याची शक्यता आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार हा महाराष्ट्राच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाच्या प्रयत्नांना मिळालेला जागतिक स्तरावरील सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
एकंदरीत, लाडघर समुद्रकिनाऱ्याला मिळालेला हा आंतरराष्ट्रीय बहुमान दापोली तालुक्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. कोकणच्या निसर्गसौंदर्याला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता मिळाल्याने दापोलीच्या पर्यटन विकासाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













