राजापूर तालुक्यातील ओणी माळीवाडी येथे भातशेतीच्या कामासाठी गेलेल्या कुटुंबातील १२ वर्षीय मुलीचा अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. गौरी दीपक गितये (वय १२, रा. ओणी माळीवाडी, ता. राजापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. शेतात खेळत असताना अचानक चक्कर येऊन ती खाली पडली. उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे ओणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी गितये ही गुरुवारी आपल्या आई देवयानी, वडील दीपक जानू गितये आणि भाऊ जयेश यांच्यासोबत भात कापणीसाठी शेतात गेली होती. शेतात आई देवयानी भात कापणीचे काम करत असताना गौरी आणि तिचा भाऊ जयेश शेतात खेळत होते.
सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या दरम्यान खेळत असताना गौरीला अचानक चक्कर आली आणि ती शेतात खाली पडली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६.४५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गौरीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अवघ्या १२ वर्षांच्या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने गितये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७०/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९.५२ वाजता ही नोंद करण्यात आली.
दरम्यान, गौरीच्या अचानक जाण्याने ओणी माळीवाडी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













