लांजा येथे मद्यधुंद अवस्थेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत प्रवेश करून शिक्षकांना मारहाण, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना लांजा तालुक्यातील वेरळ येथे घडली. शाळेतील शासकीय कामकाज सुरू असताना हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लांजा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कुणाल शांताराम कुर्णेकर (वय ३८, रा. वेरळ, गायदडीवाडी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावणेवाडी येथील रहिवासी शिक्षक नंदकुमार बळीराम भागवत (वय ५३) हे मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वेरळ मराठी शाळेत कार्यालयीन रजिस्टर भरण्याचे शासकीय काम करत होते. याचवेळी कुणाल कुर्णेकर हा मद्यधुंद अवस्थेत शाळेत आला. त्याने कोणतेही कारण नसताना शिक्षक भागवत यांच्या अंगावर धाव घेत त्यांच्या डाव्या कानावर चापट मारली.
त्यानंतर शाळेतील अन्य सहशिक्षकाची शर्टाची कॉलर पकडून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता पुन्हा शिक्षक भागवत यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे शाळेतील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर शिक्षक नंदकुमार भागवत यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५ (१)(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कुणाल कुर्णेकर याला ताब्यात घेऊन अटक केली.
या गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार आशिष शेलार यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार विलास जाधव करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













