खेड : पन्हाळजे दर्गा जेटीजवळ खाडीच्या पाण्यात 57 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला

banner 468x60

खेड तालुक्यातील पन्हाळजे दर्गा जेटी परिसरातील खाडीच्या पाण्यात एका ५७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. किशोर हरी मेढेकर (वय ५७, रा. पन्हाळजे भोईवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर मेढेकर हे मेंढीपालनाचा व्यवसाय करत होते. काही काळापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर ते मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्यांनी लोकांमध्ये मिसळणे आणि इतरांशी संवाद साधणे कमी केले होते, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पन्हाळजे दर्गा जेटी परिसरातील खाडीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ८८/२०२६ नुसार खेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *