लांजा : 76 वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, सोन्याच्या बांगड्या गायब, एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

banner 468x60

लांजा : तालुक्यातील वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी, रामगाव परिसरात घरात एकट्या असलेल्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैशाली विलास हेगिष्ट्ये असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गायब असल्याचे निदर्शनास आल्याने या घटनेचे गूढ अधिक वाढले आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुलगी घरी परतताच घटना उघड

वैशाली हेगिष्ट्ये या आपली मुलगी पल्लवी विलास हेगिष्ट्ये यांच्यासोबत वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी, रामगाव येथे राहत होत्या. दसऱ्यानंतर मायलेकी मुंबईला जाण्याच्या तयारीत होत्या. दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पल्लवी या चिकाचे दूध आणण्यासाठी वेरवली खुर्द येथे गेल्या होत्या.


काही वेळाने, पावणेबाराच्या सुमारास त्या घरी परतल्या असता त्यांना आई वैशाली या खोलीत निपचित पडलेल्या दिसल्या. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्याही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे पल्लवी यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने स्थानिक पोलीस पाटील प्रभाकर कुळ्ये यांना घटनेची माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक आमोद सरंगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर, हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव आणि महिला पोलीस प्रतीक्षा राणे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट दिली. तपासाच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या.

फॉरेन्सिक पथक, श्वान पथकाची मदत

घटनेचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली. घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून राबविण्यात आली आहे. मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की त्यामागे घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

पल्लवी हेगिष्ट्ये यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याच्या बांगड्या गायब होणे आणि वृद्धेचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी संशयावरून एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, वृद्ध महिलेच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, सोन्याच्या बांगड्या कुठे गेल्या आणि या दोन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचा तपास लांजा पोलीस करत आहेत. या तपासातून कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *