खेड तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांवर खेड पोलिसांनी कारवाई केली आहे. भोस्ते पुलाजवळील स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस शिपाई प्रशांत विनायक वाघ यांच्या फिर्यादीवरून प्रफुल प्रदीप गुहागरकर (वय २७, मूळ रा. गोवंडी, चेंबूर, मुंबई; सध्या रा. चिंचघर प्रभूवाडी, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो संबंधित ठिकाणी मद्यपान करताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी, म्हणजेच सायंकाळी ६.५० वाजता, त्याच परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई प्रकाश धोंडिबा कंक यांच्या फिर्यादीवरून अरविंद जयंत चिंचघरकर (वय २७, रा. चिंचघर प्रभूवाडी, ता. खेड) याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही तरुणांकडे मद्यपानासाठी आवश्यक अधिकृत परवाना नसताना ते सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनुक्रमे रात्री ९.२९ आणि १० वाजता गुन्हे नोंदविण्यात आले.
या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













