लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे दिवसाढवळ्या एका ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून अज्ञात दुचाकीस्वाराने पलायन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर ‘आजी, थांबा, तुमचा फोटो काढतो’ असे सांगत आरोपीने सुमारे १५ ग्रॅम वजनाचे दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. या मंगळसूत्राची किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे वेरवली परिसरात खळबळ उडाली आहे.
वेरवली खुर्द डोळेवाडी येथील सरिता दिनकर बाणे (वय ६०) या नेहमीप्रमाणे घरकामासाठी वेरवली बुद्रुक येथील दिलीप मुळे यांच्या घरी पायी जात होत्या. मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्या वेरवली खुर्द शाळा क्रमांक १ च्या पुढील वळणाजवळ पोहोचल्या.
याचवेळी पाठीमागून मोटारसायकलवरून एक अनोळखी इसम आला. त्याने बाणे यांना आवाज देत, ‘आजी, कुठे चालला आहात? तुम्हाला पुढे सोडतो,’ असे सांगितले. अनोळखी व्यक्तीने मदतीच्या उद्देशाने लिफ्ट देत असल्याचे समजल्याने बाणे या त्याच्या दुचाकीवर बसल्या.
संबंधित दुचाकीस्वाराने त्यांना मुळे यांच्या घराच्या गेटपासून सुमारे १०० मीटर अंतरावर उतरवले. त्यानंतर बाणे या पायी मुळे यांच्या घराच्या गेटकडे गेल्या. मात्र, काही अंतर गेल्यानंतर तोच इसम पुन्हा मोटारसायकलवरून त्यांच्या मागोमाग तेथे आला.
घराच्या गेटजवळ पोहोचलेल्या बाणे यांना त्याने पुन्हा आवाज देत, ‘आजी थांबा, तुमचा फोटो काढतो,’ असे सांगितले. त्यानंतर त्याने मोबाईलचा कॅमेरा त्यांच्या चेहऱ्याजवळ नेला. महिला काही समजून घेण्याच्या आतच आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे बाणे यांना काही प्रतिक्रिया देण्याची संधी मिळण्यापूर्वीच आरोपीने दागिना घेऊन मोटारसायकलवरून वेगाने पलायन केले.
बाणे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुमारे १५ ग्रॅम वजनाचे असून, त्याची अंदाजे किंमत ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
घटनेनंतर बाणे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीने वापरलेली मोटारसायकल, त्याचे वर्णन तसेच घटनास्थळाच्या आसपास उपलब्ध असलेली माहिती यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत. अज्ञात आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













