गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला

banner 468x60

गुहागर : तालुक्यातील परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून दोन अॅम्प्लिफायर मशीन चोरीला गेल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री घडली. चोरीला गेलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे ३२ हजार रुपये आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र आडविलकर (वय ५१, व्यवसाय—शेती, रा. परचरी भवडवाडी, ता. गुहागर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.०५ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान परचुरी येथील श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून अज्ञात व्यक्तीने दोन अॅम्प्लिफायर मशीन चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये अहुजा कंपनीचे काळ्या रंगाचे दोन अॅम्प्लिफायर मशीन असून, त्यांची एकूण किंमत ३२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी रात्री ७.५९ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९८/२०२६ नोंद करण्यात आला. अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) तसेच संबंधित जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिरातून साहित्य चोरीला गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी गुहागर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *