राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

banner 468x60

राजापूर तालुक्यातील नाणार-भटवाडी येथे अज्ञात चोरट्याने दिवसा घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे १२ हजार रुपये किमतीचे चांदीचे साहित्य चोरून नेल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता वासुदेव साईम (६५, सेवानिवृत्त, रा. नाणार-भटवाडी, ता. राजापूर) यांच्या राहत्या घरी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने दोन्ही बेडरूममधील कपाटे उचकटून त्यातील मौल्यवान वस्तूंची तपासणी केली. यावेळी त्याने सुमारे ४ हजार ५०० रुपये किमतीचे एक वाटी असलेले चांदीचे हळदी-कुंकवाचे भांडे तसेच ७ हजार ५०० रुपये किमतीचे गोल आकाराचे चांदीचे निरंजन असा एकूण १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर नाटे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १०३/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३०५(अ) तसेच संबंधित जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसा घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने घरफोडी केल्याने परिसरात चिंता व्यक्त होत असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी नाटे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *