गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तावर तैनात असलेल्या होमगार्डने नागरिकांमधील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग आल्याने एका तरुणाने होमगार्डची गणवेशाची कॉलर पकडून मारहाण केली. त्यानंतर दोन्ही हातांनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी रात्री कुवारबांव ग्रामपंचायतीजवळ घडला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयुर मोहन पाटील (२६, रा. पानवल आपकरेवाडी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार लखन रामचंद्र चिकोडीकर (२९, रा. उत्कर्ष नगर, सहजीवन सोसायटी, कुवारबांव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, मयुर पाटील हे कुवारबांव येथील श्री ओम साई तरुण मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी पोलिसांसोबत बंदोबस्तावर तैनात होते. विसर्जनाचा बंदोबस्त आटोपल्यानंतर ते साक्षीदारांसोबत परत जात असताना ग्रामपंचायतीजवळ काही नागरिकांमध्ये वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाटील यांनी मध्यस्थी करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने त्यांच्या अंगावरील होमगार्ड गणवेशाची कॉलर पकडून त्यांना खेचल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीने मयुर पाटील यांच्या मानेवर आणि तोंडावर हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपीने दोन्ही हातांनी पाटील यांचा गळा जोरात दाबला आणि “तुला आत्ताच ठारच मारून टाकतो,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या झटापटीत होमगार्डच्या गणवेशाचे एक बटन तुटून नुकसान झाल्याचेही पोलिस नोंदीत नमूद आहे.
घटनेनंतर मयुर पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गु.र.नं. ३७१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १०९(१), १२१(१), १३२ आणि ३२४(२) अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













