राजापुरात जमिनीच्या वादातून 70 वर्षीय महिलेवर हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा

banner 468x60

राजापूर येथे जमिनीच्या वादातून ७० वर्षीय महिलेच्या घराच्या परसव्यातील शौचालयाची टाकी तोडण्यास विरोध केल्याने महिलेला धक्काबुक्की, शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील चिखलगाव वरची जड्यारवाडी येथे घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी आनंदी बाप पळसमकर (वय ७०, रा. चिखलगाव वरची जड्यारवाडी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात जमीन-जागेवरून वाद सुरू आहे. या वादासंदर्भात राजापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल असून तो न्यायप्रविष्ट आहे.

घटनेच्या दिवशी तक्रारदार यांच्या घराच्या पाठीमागील परसव्यात काहीतरी तोडण्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहिले असता आरोपी त्यांच्या परसव्यातील संडासची टाकी तोडत असल्याचे दिसले. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना असे करू नका, आपण घरी एकट्याच असल्याचे सांगत, मुलं आल्यानंतर किंवा न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यास सांगितले.

मात्र, आरोपींनी त्यांचे म्हणणे ऐकले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदार त्यांना थांबवण्यासाठी पुढे गेल्या असता आरोपींनी गैरकायदा जमाव करून त्यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ करत आरोपी क्रमांक ४ आणि ५ यांनी त्यांचे दोन्ही हात पकडून मारहाण केली व त्यांना संडासच्या टाकीत ढकलून दिले. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय आरोपी क्रमांक १, २ आणि ३ यांनी तक्रारदारांच्या परसव्यातील १० वर्षांपूर्वी लावलेली चार नारळाची झाडे, चार सुपारीची झाडे, दोन लिंबाची झाडे, चार केळीची झाडे आणि एक आंब्याचे झाड तोडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या झाडांमुळे सुमारे ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

झटापटीदरम्यान तक्रारदार यांच्या गळ्यातील बोरमाळ तुटून नुकसान झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ७९, ३५१(२) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *