Kokan  

रत्नागिरी : ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत रत्नागिरीत पोलिसांची मोठी कारवाई, 1 लाख 36 हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त

banner 468x60

रत्नागिरी येथे अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार परिसरात संशयास्पदरीत्या आढळलेल्या एका इसमाकडून विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत सुमारे १ लाख ३६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी आठवडा बाजार, रत्नागिरी येथे एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ब्राऊन हेरॉईन आढळून आले.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इसमाने हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगला होता. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ₹१,३६,००० किमतीचा ब्राऊन हेरॉईन जप्त केला आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात रत्नागिरी पोलिसांनी ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये संशयित हालचालींवर लक्ष ठेवून पेट्रोलिंग आणि तपासणी केली जात आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग गोरे, पोलीस हवालदार अमित कदम, विजय आंबेकर, गणेश सावंत तसेच पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांचा समावेश होता.

या प्रकरणात संबंधित आरोपीविरोधात नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *