चिपळूण तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी परिसरात पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणाकडून १ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. सुमारे १ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी तरुणाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खेर्डी एमआयडीसी परिसरात गस्त घालत होते. यावेळी चामुंडा स्टील अँड टिंबर दुकानासमोर प्रणय रमाकांत जाधव (वय २१, रा. सती, समर्थनगर, ता. चिपळूण) हा संशयास्पदरीत्या आढळून आला.
पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोणीची तपासणी केली. त्यामध्ये १ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा आढळून आल्या. या तारांबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, त्याच्या मालकी हक्काबाबत तो समाधानकारक खुलासा करू शकला नाही.
यानंतर पोलिसांनी तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार दिपराज प्रकाश पाटील (ब.नं. १४०७) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर २९६/२०२६ अन्वये प्रणय जाधव याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













