रत्नागिरी : जिल्ह्यात 3 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, मोर्चा, मिरवणूक, सभांसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक, काय आहेत निर्बंध? पाहा

banner 468x60

रत्नागिरी : आगामी सण-उत्सव, विविध आंदोलने आणि कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

हे आदेश १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात लागू राहणार आहेत.

या कालावधीत ज्येष्ठागौरी विसर्जन, अनंत चतुर्दशी, अंगारक संकष्ट चतुर्थी तसेच महात्मा गांधी जयंती असे विविध सण-उत्सव होणार आहेत. त्याचबरोबर खेड येथील कोका-कोला कंपनी, अलोरे-शिरगाव येथील सायफिस्ट कंपनी, वाटद-खंडाळा येथील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

आदेशाच्या कालावधीत हत्यारे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या, सोटे किंवा दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास बंदी राहणार आहे. तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ सोबत नेणे, दगड किंवा फेकावयाची साधने जमा करणे अथवा तयार करणे यावरही निर्बंध आहेत.

शांतता भंग होईल अशी भाषणे करणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे तसेच व्यक्ती, प्रेते किंवा आकृत्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येण्यासाठी परवानगी आवश्यक

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय एकत्र जमता येणार नाही. मोर्चा, मिरवणूक किंवा सभा आयोजित करायची असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, अंत्ययात्रा, धार्मिक विधी, विवाह सोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत तैनात कर्मचारी यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही आदेशातून वगळण्यात आले आहे.

त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेशाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिक, विविध संस्था आणि संघटनांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *