चिपळूण येथे दुचाकीच्या दोन्ही हँडलला लोंबकळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या हँडलमध्ये अडकल्याने नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर कोडमला पाटाजवळ घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप गणपत पाटील (६०, रा. शंकरवाडी, चिपळूण) हे त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलवरून सावर्डेहून चिपळूणच्या दिशेने जात होते. त्यांनी दुचाकीच्या दोन्ही हँडलला केबल आणि विद्युत साहित्य असलेल्या दोन प्लास्टिकच्या पिशव्या अडकवल्या होत्या.
सायंकाळी पाचच्या सुमारास कोडमला पाटाजवळील चढावावरील वळणावर दुचाकी आली असता हँडलला अडकवलेल्या पिशव्या हँडलमध्ये अडकल्या. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून पाटील यांचा तोल गेला आणि ते मोटारसायकलसह रस्त्यावर कोसळले.
या अपघातात त्यांच्या तोंडाला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान किंवा दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, दुचाकी चालविताना निष्काळजीपणे पिशव्या हँडलला अडकवल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहितेतील कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद सावर्डे पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार स्वप्निल विजय साळवी यांनी दिली असून, सावर्डे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













