रत्नागिरी : मिशन फिनिक्सअंतर्गत रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई, 16 गुन्हे दाखल, 22 आरोपी अटक

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, बाळगणे आणि सेवन करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत धडक मोहीम राबवली. ८ ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १६ गुन्हे दाखल करून २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांची विक्री करणारे, बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ बाळगणारे तसेच त्यांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.

या विशेष मोहिमेत अमली पदार्थ सेवनाचे १० गुन्हे, तर अमली पदार्थ बाळगल्याचे ६ गुन्हे दाखल करण्यात आले. या एकूण १६ गुन्ह्यांमध्ये २२ जणांना अटक करण्यात आली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ७७ हजार रुपये किमतीचे ५.१५ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन तसेच १ लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा २.५११ किलो गांजा जप्त केला. अशाप्रकारे एकूण २ लाख २ हजार २०० रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांच्या हाती लागला.

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री, तस्करी, वाहतूक, साठवणूक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. युवक आणि समाजाला अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईसोबतच जनजागृतीपर उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

दरम्यान, अमली पदार्थांची विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा सेवनासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी ती जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे. तसेच ‘रत्नसेतु चॅटबॉट’ 9371415612 या क्रमांकावरही माहिती देता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *