साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारत सोन्याचे मंगळसूत्र आणि अंगठी असा एकूण सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता विकास अवसरे (वय ४८, व्यवसाय गृहिणी, सध्या रा. परळ, मुंबई; मूळ रा. प्रभानवल्ली, वाणेवाडी, ता. लांजा) या आपल्या पतीसह अंत्रवली, ता. संगमेश्वर येथे जाण्यासाठी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. त्यांना पुढील प्रवासासाठी बस पकडायची होती.
दरम्यान, कोल्हापूर ते संगमेश्वरमार्गे चिपळूण जाणारी बस बसस्थानकात आल्यानंतर अवसरे या पतीसह बसमध्ये चढण्यासाठी पुढे सरकत होत्या. यावेळी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटावर हात साफ केला. गर्दीमध्ये ही चोरी झाल्याने सुरुवातीला अवसरे यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही.
काही वेळाने पर्समधील पाकिटाची पाहणी केल्यानंतर त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पाकिटामध्ये अंदाजे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ज्याची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये, तसेच सुमारे साडेतीन ग्रॅम वजनाची आणि १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी होती. दोन्ही दागिने मिळून सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर अवसरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करता आली नाही. त्यानंतर त्यांनी १७ सप्टेंबर रोजी रात्री ८.५१ वाजता देवरूख पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून देवरूख पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बसस्थानक परिसरातील हालचाली, संभाव्य साक्षीदार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बसमध्ये चढताना किंवा उतरताना पर्स, पाकीट आणि दागिने सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













