संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणावर रानगव्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्वप्निल जयराम पेंडांमकर (वय ३६, रा. सह्याद्रीनगर, साडवली-देवरुख, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अनिकेत विजय सुर्वे यांनी पोलिसांना खबर दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता स्वप्निल पेंडांमकर हे आंबव येथील ‘श्रवण हॉटेल’जवळ आले होते. लघुशंकेसाठी ते तेथे थांबले असताना अचानक रानगवा त्यांच्या अंगावर धावून आला. रानगव्याने केलेल्या हल्ल्यात स्वप्निल हे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील चिरायू हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वालावलकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात स्वप्निल यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२३ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे साडवली-देवरुख परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रानगव्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













