दापोली : वणौशी येथे कीटकनाशकांच्या सुरक्षित हाताळणीबाबत प्रात्यक्षिक

banner 468x60

प्रतिनिधी:सागर गोवळे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत कृषी स्नेही गटाच्या वतीने वणौशी तर्फ पंचनदी येथे शेतकऱ्यांसाठी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

शेतकऱ्यांमध्ये कीटकनाशकांचा सुरक्षित व योग्य वापर, हाताळणी, साठवणूक तसेच फवारणीदरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश होता. यावेळी कीड ओळखल्यानंतरच योग्य कीटकनाशकाची निवड करणे, उत्पादनाच्या लेबलवरील शिफारस केलेली मात्रा व वापराच्या सूचना वाचणे, विषारीपणाची चिन्हे व रंगपट्ट्या समजून घेणे याबाबत माहिती देण्यात आली.

प्रात्यक्षिकादरम्यान हातमोजे, मास्क, गॉगल्स, पूर्ण बाह्यांचे कपडे, अॅप्रन व गमबूट यांसारख्या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) वापर करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कीटकनाशक मोजताना व मिसळताना शिफारशीनुसार योग्य प्रमाणाचा वापर करणे, जास्त मात्रा टाळणे तसेच योग्य शिफारशीशिवाय विविध रसायने एकत्र न मिसळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फवारणीपूर्वी फवारणी यंत्र, नोजल व गळती तपासणे तसेच योग्य कॅलिब्रेशन करून एकसमान फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

फवारणी करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी, वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी आणि जोरदार वारा किंवा पावसाच्या वेळी फवारणी टाळावी, असे सांगण्यात आले. फवारणीदरम्यान खाणे, पिणे किंवा धूम्रपान करू नये तसेच फवारणीचा फवारा माणसे, जनावरे, घरे व पाण्याच्या स्रोतांकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. फवारणीनंतर हात, चेहरा व शरीराचे उघडे भाग स्वच्छ धुवून स्नान करणे आणि फवारणीची साधने व्यवस्थित स्वच्छ करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कीटकनाशके मूळ लेबल असलेल्या डब्यांमध्ये, लहान मुले, जनावरे, अन्नधान्य व पशुखाद्यापासून दूर सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. रिकाम्या कीटकनाशकांच्या डब्यांचा अन्न किंवा पाणी साठवण्यासाठी पुनर्वापर करू नये. तसेच मधमाश्या व इतर उपयुक्त कीटकांचे संरक्षण करण्यासाठी गरज नसताना फवारणी टाळावी, याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

प्रात्यक्षिकाच्या आयोजनामध्ये कृषी स्नेही गटातील समृद्धी जाधव, आकांक्षा गाडगे, श्रावणी मोरे,तन्वी नादिवडेकर,नीलम मदने,कोमल झिरवाळ,श्रुती बोबडे,अंकिता मुंज,सलोनी सावंत,साक्षी लोके यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सदर प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. समीर काळे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *