दापोली : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील तब्बल ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोजित या मेळाव्याला शिवसेनेचे मुंबई तसेच ग्रामीण भागातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका आणि विकासकामांबाबत मार्गदर्शन केले. “तुम्ही दिलेली ताकद तुमच्याच उपयोगी आली पाहिजे,” असे सांगत पक्षासाठी काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मतदारसंघातील उद्योग-व्यवसायांना चालना देतानाच त्याचा लाभ स्थानिकांना मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या गावातील विकासकामांची जबाबदारी स्वीकारावी. विकासकामांसाठी आवश्यक निधीबाबत कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यकर्त्यांशी संवादाची साखळी मजबूत करण्यावर भर
गावातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच दुःखद घटना तालुका कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कदम यांनी केले. “कार्यकर्त्यांसोबत असलेला संवाद तुटू देऊ नका. आपल्या मधली एकजुटीची साखळीही तुटू देऊ नका,” असा संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
कार्यकर्त्यांशी अधिक थेट संपर्क राहावा यासाठी महिन्यातील एक दिवस एखाद्या गावात मुक्काम करून संपूर्ण दिवस आढावा बैठक घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात खेडमधून केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील विकासाबाबत भूमिका स्पष्ट
कोकणातील विकास आणि पर्यावरणाबाबत बोलताना योगेश कदम यांनी, “महाराष्ट्राचा मंत्री असलो तरी माझी पहिली बांधिलकी माझ्या कोकणाशी आहे. कोकणाच्या सौंदर्याला बाधा येऊ देणार नाही,” अशी भूमिका मांडली.
दाभोळ-भिवबंदर परिसरातील संभाव्य ऊर्जा प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या भूमिकेला महत्त्व दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्या भूमिकेचा विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आधुनिकीकरणाचा संकल्प
दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठी CSRच्या माध्यमातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्न केले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले. ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याचे आवाहन
मेळाव्याचा प्रमुख केंद्रबिंदू आगामी ग्रामपंचायत निवडणुका हा होता. गावागावात शिवसेनेच्या विचारांचे पॅनेल उभे करण्यासोबतच ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांनी केवळ वरिष्ठ नेत्यांवर अवलंबून न राहता गावपातळीवर स्वतःची संघटनात्मक ताकद निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. गावागावातील कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधार असून स्थानिक पातळीवर संघटन मजबूत असेल, तर कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते, असा सूर त्यांच्या मनोगतातून उमटला.
या मेळाव्याला जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, विधानसभा संपर्कप्रमुख सुधीर कदम, सहसंपर्कप्रमुख प्रवीण लाड, दापोली संपर्कप्रमुख प्रदीप जाधव, तालुका संघटक प्रकाश कालेकर, सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, महिला आघाडी जिल्हा संघटक रोहिणी दळवी, चारुता कामतेकर, नगराध्यक्षा कृपा घाग यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













