संगमेश्वर : गणपती सजावट करताना विजेचा धक्का, 36 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

banner 468x60

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरात गणपती सजावटीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथील ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुहास विष्णू केळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मुरडव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सुहास केळकर हे आपल्या घरात गणपती सजावटीचे काम करत होते. सजावटीसाठी विद्युत रोषणाईचे तोरण लावत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का बसताच ते खाली कोसळले.

घटना लक्षात येताच त्यांचे भाऊ स्वप्निल विष्णू केळकर यांनी तातडीने सुहास यांना वाहनातून आरवली येथील डॉ. भायजे यांच्याकडे उपचारासाठी नेले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार सुहास यांना डेरवण येथे नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात BNSS कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. याप्रकरणी आमृ क्रमांक ३८/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने मुरडव-सुतारवाडी परिसरावर शोककळा पसरली असून, केळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *