खेड : गणेशोत्सवासाठी पार्श्वभूमीवर लोटे एमआयडीसीत पोलीस अधीक्षकांचा उद्योग आणि वाहतूक संघटनांशी संवाद

banner 468x60

आगामी गणेशोत्सव-2026 च्या पार्श्वभूमीवर लोटे एमआयडीसी परिसरातील उद्योग, वाहतूक व्यवस्था तसेच कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योग भवन, लोटे एमआयडीसी येथे दि. 11 सप्टेंबर रोजी झालेल्या या बैठकीत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी उद्योग व वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत गणेशोत्सव काळातील संभाव्य अडचणी आणि उपाययोजनांबाबत चर्चा केली.

बैठकीस पोलीस अधीक्षक नितीन बगाटे प्रमुख उपस्थित होते. यावेळी खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, लोटे पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार, खेड व चिपळूण येथील वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योग भवनचे अध्यक्ष राज आंब्रे तसेच लोटे एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान लोटे एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना गणेशोत्सवाच्या कालावधीत येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणी, वाहतूक समस्या तसेच सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न जाणून घेण्यात आले. उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर आवश्यक उपाययोजना, पोलीस बंदोबस्त आणि परस्पर समन्वयाबाबत पोलीस अधीक्षक बगाटे यांनी मार्गदर्शन केले.

गणेशोत्सवाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेता वाहतूक नियोजनाला विशेष महत्त्व देण्यात आले. वाहतूक कोंडी टाळणे, चाकरमानी आणि गणेशभक्तांचा प्रवास सुरळीत ठेवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अन्य आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

तसेच गणेशोत्सव-2026 च्या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर लागू असलेल्या निर्बंधांची माहिती वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक संघटनांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या काळात उद्योग क्षेत्र, वाहतूक संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यात योग्य समन्वय राहिल्यास नागरिक, कामगार आणि चाकरमानी यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *