चिपळूण रेल्वे स्टेशन परिसरात गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत २१३ ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थासह दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा क्रमांक २७७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८ (क) आणि २० (ब) ii (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.०६ वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वे स्टेशन शेजारी संशयित आरोपी संकीर्ण राजेश कदम (वय २८, रा. रेहाळभागाडी, ता. चिपळूण) हा दुचाकीसह तसेच हातातील निळ्या रंगाच्या बॅगेत पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत आढळून आला.
या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीकडून २१३ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या पदार्थामध्ये पाने, फुले, काड्या व बिया असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईत संशयित आरोपी संकीर्ण कदम याला दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३४ वाजता अटक करण्यात आली. त्यानंतर तपासात ऋषिकेश अशोक पवार (वय २९, रा. पागमळा, स्वानंद अपार्टमेंट, बी विंग, चिपळूण) याने संशयित आरोपी क्रमांक एक याला सदरचा माल विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याच्या संशयावरून त्यालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले. ऋषिकेश पवार याला त्याच दिवशी सायंकाळी ७.३५ वाजता अटक करण्यात आली.
पोलिसांनी या कारवाईत सुमारे १४ हजार रुपये किमतीचा २१३ ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ तसेच ८६ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर २२० दुचाकी (क्रमांक एमएच ४३ एजी ७१५३) असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













