रत्नागिरी : 4 जिल्ह्यांतून तडीपार असतानाही रत्नागिरीत वावर, अट्टल गुन्हेगाराला एलसीबीने पकडले

banner 468x60

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका गुन्हेगाराने तडीपारीच्या आदेशाचा भंग करून रत्नागिरी शहरात बेकायदेशीर प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने मांडवी ते पेठकिल्ला मार्गावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मदताहिर इब्राहिम मस्तान (वय ३६, रा. वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मदताहिर याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) अन्वये त्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.

तडीपारीचा हा अधिकृत आदेश आरोपीला १२ जुलै २०२६ रोजी रीतसर बजावण्यात आला होता. या आदेशानुसार संबंधित चार जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास अथवा वास्तव्यास राहण्यास त्याला सक्त मनाई करण्यात आली होती.

मात्र, आदेशाचा भंग करून आरोपी रत्नागिरी शहरात बेकायदेशीररीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास मांडवी ते पेठकिल्ला जाणाऱ्या मार्गावरील अलहंम पार्कसमोर सापळा रचला.

यावेळी मोहम्मदताहिर हा परिसरात फिरताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १४१ व १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *