चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डेतील धोकादायक खड्ड्याची अखेर कायमस्वरूपी दुरुस्ती

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आरती स्वीटसमोरील धोकादायक खड्ड्याची अखेर संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली आहे. वारंवार डागडुजी करूनही काही दिवसांतच पुन्हा खड्डा पडत असल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

banner 728x90

या ठिकाणी यापूर्वी अनेकदा खडी, डांबर आणि काँक्रीट टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर खड्ड्याची खोली लक्षात येत नसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा भाग धोकादायक ठरत होता. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.

समस्या गंभीर असल्याने स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी तसेच लोकप्रतिनिधींनी संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला. माध्यमांनीही या धोकादायक खड्ड्याचा प्रश्न वेळोवेळी मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले.

अखेर संबंधित यंत्रणेने या समस्येची दखल घेत केवळ खड्डा बुजविण्याऐवजी खराब झालेला संपूर्ण भाग खोदून काढला. त्यानंतर या ठिकाणी नव्याने काँक्रीट पॅच टाकून दुरुस्तीचे काम करण्यात आले. कामादरम्यान महामार्गावरील वाहतूक काही काळ एकेरी करण्यात आली होती. त्यामुळे वाहनचालकांना झालेल्या तसदीबद्दल संबंधित यंत्रणेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

नव्याने करण्यात आलेल्या दुरुस्तीमुळे हा भाग अधिक मजबूत होऊन वारंवार खड्डे पडण्याची समस्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सावर्डे परिसरातील इतर धोकादायक ठिकाणांचीही तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी  दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *