दापोली : पपईपासून जॅम निर्मिती, मूल्यवर्धनातून महिला शेतकऱ्यांना स्वावलंबनाची नवी दिशा

banner 468x60

अतिरिक्त पिकलेल्या पपईची नासाडी थांबवून त्यापासून प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या उद्देशाने दापोली तालुक्यातील मुगीज गावात पपईपासून जॅम तयार करण्याचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘बीजांकुर ग्रुप’च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कृषी तज्ज्ञ डॉ. महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रात्यक्षिकाला गावातील २६ महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

banner 728x90

पिकलेल्या पपईवर प्रक्रिया करून तिचे मूल्यवर्धन करणे आणि त्यातून शेतकरी तसेच महिला बचत गटांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पपईमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील तंतू मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अतिरिक्त पिकलेल्या पपईपासून वर्षभर टिकणारा पौष्टिक जॅम तयार केल्यास शेतमालाची नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.

अशी झाली पपई जॅमची निर्मिती

प्रात्यक्षिकासाठी एक किलो स्वच्छ धुऊन, सोललेली आणि बिया काढलेली पपई, एक किलो साखर तसेच आवश्यकतेनुसार सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस वापरण्यात आला. पपईचा लगदा तयार करून त्यामध्ये साखर मिसळण्यात आली. त्यानंतर हे मिश्रण सतत ढवळत गरम करण्यात आले. योग्य घट्टपणा आल्यानंतर त्यामध्ये सायट्रिक ॲसिड मिसळण्यात आले.

जॅम योग्य प्रकारे तयार झाला आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी ‘शीट टेस्ट’ आणि ‘ड्रॉप टेस्ट’ करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेतून सुमारे दीड किलो आकर्षक, गोड आणि दर्जेदार पपई जॅम तयार करण्यात आला.

महिला बचत गटांच्या माध्यमातून पपई जॅम निर्मितीचा लघुउद्योग सुरू केल्यास महिलांना घरबसल्या रोजगार आणि अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या फळांवर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन केल्यास शेतमालाला अधिक चांगला दर मिळवून देण्यासोबतच ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, ‘रावे’ कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. महेश कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *