रत्नागिरीत बंदुकीने धमकावलं, तपासात ‘टॉय आर्म’ असल्याचे निष्पन्न

banner 468x60

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांच्या तपासणीत घटनास्थळी मिळालेली बंदुकीसदृश वस्तू ही टॉय आर्म अर्थात खेळण्यातील बंदूक असल्याचे निष्पन्न झाले.

banner 728x90

दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता नॅशनल मेडिकल शेजारील कस्तुरी चायनिज सेंटर, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, साजिदा समीर काझी या त्यांच्या चायनिज सेंटरमध्ये असताना त्यांचे नातेवाईक नसीरा हरीस शेख, हरीस आदम शेख आणि संजय वासुदेव पुनतळेकर हे तेथे आले. यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. वादादरम्यान शिवीगाळ करून बंदुकीच्या सहाय्याने धमकावल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले.

घटनास्थळी पोलिसांना बंदुकीसदृश वस्तू मिळून आली. या वस्तूची पोलीस पथक तसेच तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीत ती टॉय आर्म असून हवेच्या दाबावर चालणारी खेळण्यातील बंदूक असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांवर अफवा पसरू नयेत, तसेच अपूर्ण अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *