राजापूर तालुक्यातील सौंदळ मुसलमानवाडी येथून ३० वर्षीय महिला घरातील कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मानसिक आजारावर उपचार सुरू असलेल्या या महिलेचा कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच परिसरात शोध घेतला. मात्र, चार दिवस शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर तिच्या वडिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून महिलेचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम युसुफ पाटणकर असं बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या मजुरीचं काम करतात. शबनम यांच्यावर मानसिक आजारासाठी रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. त्यांना यापूर्वीही घरातून अचानक निघून जाण्याची सवय असल्याचं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं आहे. यापूर्वी त्या घरातून निघून गेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा घरी परतल्या होत्या.
रात्रीच्या सुमारास घरातून निघून गेल्या
४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजल्यापासून ५ ऑगस्टच्या पहाटे दोन वाजेपर्यंतच्या कालावधीत शबनम पाटणकर या सौंदळ मुसलमानवाडी येथील आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या. त्या घरातून निघून गेल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांचा शोध सुरू केला.
सुरुवातीला नातेवाईकांकडे तसेच आसपासच्या परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. संभाव्य ठिकाणी चौकशी करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी शोध घेऊनही शबनम यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. चार दिवस कुटुंबीयांकडून शोधमोहीम सुरू होती. अखेर ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी राजापूर पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार नोंदवली.
बेपत्ता महिलेचे वर्णन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबनम पाटणकर यांचा रंग गोरा असून अंगकाठी सडपातळ आहे. त्यांचा चेहरा उभट असून उंची सुमारे ५ फूट ५ इंच आहे. त्या घरातून बाहेर पडताना लाल रंगाचा अनारकली ड्रेस आणि निळ्या रंगाची ओढणी परिधान केलेली होती. त्यांच्या डोक्याचे केस काळे आणि लांब आहेत. विशेष म्हणजे त्या मोबाईल फोन वापरत नसल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांसमोर आणखी एक अडचण निर्माण झाली आहे.
पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून बेपत्ता महिलेचा विविध ठिकाणी शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.
दरम्यान, शबनम पाटणकर यांच्याबाबत कोणत्याही नागरिकाला माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने राजापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













