Breaking News
दापोली : ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तक्रार दाभोळ पोलिसांकडे वर्ग दाभोळ : खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराप्रदूषित सांडपाण्यामुळे मासेमारीचे नुकसान, मंत्री नितेश राणे यांचे यंत्रणांना निर्देश मंडणगड : अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांचा AI चा आधार दापोली : रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात रत्नागिरीत 56 वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू, उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी केले मृत घोषित

दापोली : ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल, तक्रार दाभोळ पोलिसांकडे वर्ग

banner 468x60

दापोली एसटी आगारातील ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या ड्युटी आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला फोन करून धमकी दिल्याच्या आरोपावरून दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(3) अन्वये अदखलपात्र गुन्हा अर्थात एन.सी. नोंदवण्यात आली आहे. सदर एन.सी. पुढील कार्यवाहीसाठी दाभोळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

banner 728x90

प्रथमेश दिगंबर खोत (वय 32, व्यवसाय – ई-शिवाई इलेक्ट्रिक बस अलोकेशन सुपरवायझर, रा. दाभोळ, भाटकरवाडी, ता. दापोली) यांनी पोलिसांकडे ही तक्रार दिली आहे. खोत हे मोरया ट्रान्स इंडिया प्रा. लि. या कंपनीतर्फे दापोली एसटी डेपो येथे ई-शिवाई इलेक्ट्रिक बस अलोकेशन सुपरवायझर म्हणून कार्यरत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, ई-शिवाई इलेक्ट्रिक बस तसेच चालकांच्या ड्युट्या लावण्याचे काम तक्रारदाराकडे आहे. याच कामाच्या अनुषंगाने तीन चालकांच्या ड्युटी रद्द करण्यात आल्याच्या कारणावरून संबंधित फोन आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रात्री फोन करून ड्युटी रद्द न करण्याचा दबाव?

पोलिस तक्रारीनुसार, 7 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10.55 वाजता प्रथमेश खोत हे दाभोळ येथील आपल्या निवासस्थानी असताना प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला. यावेळी संबंधितांनी तीन जणांच्या ड्युटी का कॅन्सल केल्या, त्यांच्या ड्युटी कॅन्सल करू नका, असे सांगितल्याचा आरोप आहे.

तक्रारीत पुढे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. ड्युटी रद्द केल्यास ‘सगळ्या गाड्या पेटवून टाकीन’, तसेच ‘तिघांपैकी एकाची जरी ड्युटी कॅन्सल केलीस तर तुला स्टाफसकट जाळीन’, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

याशिवाय, ‘माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा आदेश, लक्षात ठेव’, तसेच ‘माझा आदेश म्हणजे पक्षाचा आदेश’ अशा शब्दांचा वापर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कथित संभाषणामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

‘मी प्रोजेक्ट हेडच्या आदेशाने ड्युटी लावतो’

फोनवरील संभाषणादरम्यान तक्रारदाराने आपण स्वतःच्या निर्णयाने चालकांच्या ड्युट्या लावत नसून प्रोजेक्ट हेड यांच्या आदेशानुसार ड्युटीचे नियोजन करत असल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारदाराने आपले प्रोजेक्ट हेड गणेश घारे असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने ‘तुम्ही लोकल आहात, सरळ रहा. तुझ्या वरच्या हेडला मी फोन लावतो’, असे सांगून फोन बंद केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

पोलिसांकडे तक्रार; BNS 351(3) अंतर्गत एन.सी.

या संपूर्ण प्रकारानंतर प्रथमेश खोत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीतील आरोपांच्या आधारे दापोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा रजिस्टर क्रमांक 00/2026, भारतीय न्याय संहिता कलम 351(3) अन्वये नोंद करण्यात आली आहे.

पोलिस नोंदीनुसार, सदर घटना दाभोळ येथील तक्रारदाराच्या निवासस्थानी असताना फोनद्वारे घडल्याचे नमूद आहे. घटना दाभोळ परिसराशी संबंधित असल्याने ही एन.सी. पुढील कार्यवाहीसाठी दाभोळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येत आहे.

राजकीय नावांचा उल्लेख असल्याने प्रकरण चर्चेत

या तक्रारीमध्ये धमकी देताना योगेश कदम यांच्या नावाचा तसेच पक्षाच्या आदेशाचा कथित उल्लेख झाल्याचा दावा करण्यात आल्याने या प्रकरणाला राजकीय संदर्भही प्राप्त झाला आहे. मात्र, तक्रारीत नमूद केलेले हे आरोप असून त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या या आरोपांबाबत त्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. संबंधितांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या प्रकरणात पोलिसांकडे अदखलपात्र नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही दाभोळ पोलीस ठाण्याकडून केली जाणार आहे. त्यामुळे या कथित फोन संभाषणामागील नेमका वाद काय होता, ड्युटी रद्द करण्याचे कारण काय होते आणि तक्रारीतील आरोपांबाबत पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *