चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडून खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यात या ठिकाणी दोन वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र, खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अवघ्या काही दिवसांतच रस्ता पुन्हा उखडला. आरती स्वीटसमोरील भरलेले खड्डे केवळ तीन दिवसांतच पूर्ववत झाल्याचे दिसून येत आहे.

सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यावरील खोल भेगा आणि उखडलेल्या भागामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोकणातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. त्यामुळे सावर्डे परिसरातील धोकादायक खड्ड्यांची तातडीने दर्जेदार व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे.
नागरिकांनी इशारा दिला आहे की, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी; अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













