रत्नागिरी : गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत शिक्षकाची तब्बल साडेसहा लाखांची सायबर फसवणूक

banner 468x60

रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची भीती दाखवून एका शिक्षकाची तब्बल ६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान सिद्धीविनायक नगर, शिवाजीनगर येथे घडली. याप्रकरणी रमेश विश्राम खापरे (वय ५४, व्यवसाय – शिक्षक) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, खापरे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगितले. गॅस कनेक्शनचे अपडेट न केल्यास पुरवठा बंद होईल, असे सांगून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर ‘Mahanagar Gas Bill Update’ नावाची अॅप्लिकेशन फाईल पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगितले.

संबंधित अॅप उघडल्यानंतर त्यामध्ये डेबिट कार्डची माहिती भरण्यास सांगण्यात आले. खापरे यांनी दिलेली माहिती वापरून आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून विविध व्यवहारांद्वारे ६ लाख ४८ हजार ६१२ रुपये परस्पर काढून घेतले. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेनंतर त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध शासकीय संस्था, बँका, गॅस कंपन्या किंवा सेवा पुरवठादारांच्या नावाने फोन अथवा संदेश पाठवून बनावट अॅप्स डाउनलोड करण्यास भाग पाडले जात असल्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईलमध्ये APK फाईल किंवा अज्ञात अॅप इन्स्टॉल करू नये. तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती, CVV क्रमांक, OTP अथवा नेटबँकिंगची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *